Maharashtra Rain संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव आता स्पष्टपणे जाणवू लागला आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाने जोरदार आगमन केले आहे. गेले काही दिवस कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे आणि आता हा पाऊस विदर्भ व मराठवाड्याच्या दिशेनेही सरकत आहे. काही भागांमध्ये जोरदार सरींची नोंद करण्यात आली आहे.
आज दिनांक २७ जून रोजी हवामान विभागाने कोकण आणि घाटमाथ्याच्या काही भागांसाठी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
हवामान खात्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, उर्वरित कोकण आणि मराठवाड्यासाठीही ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. याचा अर्थ या भागांत पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडू शकतात. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशाराही देण्यात आला आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळपर्यंत परभणीच्या कृषी विद्यापीठात राज्यातील सर्वाधिक तापमान ३४.४ अंश सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं.
वाशीम जिल्ह्यातील मालेगावमध्ये तब्बल १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, महागाव आणि उमरखेड या भागांमध्येही १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे समोर आले आहे. यावरून विदर्भात मान्सूनचा जोर आता चांगलाच वाढल्याचं स्पष्ट होत आहे.
कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये पावसाचा जोर टिकून
रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे, मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. नागपूर आणि भंडारा या भागांसाठीही पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
वादळी व विजांचा इशारा असलेले जिल्हे
राज्यातील नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे.
मान्सून लवकरच देशभर पसरण्याची शक्यता
देशात मान्सूनचा वेग झपाट्याने वाढतो आहे. २६ जून रोजी राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांतही मान्सून दाखल झाला आहे. जैसलमेर, बिकानेर, भारतपूर, रामपूर, सोनीपत यांसारख्या भागांमध्येही पावसाची नोंद झाली असून लवकरच मान्सून संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
ओडिशा-बंगाल किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय
वायव्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांमुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा पार करत झारखंड व छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र ते या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत वायूचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम
सध्याची परिस्थिती पाहता, राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची दाट शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाच्या सरी कायम राहतील. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.







